Saturday, December 3, 2011

'जगणं उलगडताना' पुस्तकाविषयी

आताच डॉ. संजय ओक यांचं 'जगणं उलगडताना' पुस्तक वाचून झालं. हे पुस्तक म्हणजे लोकसत्ताच्या पुरवणीमधून वेळोवेळी प्रकाशित झालेल्या लेखांचा संग्रह आहे. यापूर्वीही यातील काही लेख वाचनात आले होते ते पुन्हा वाचताना 'जुने काहीतरी ओळखीचे' भेटल्याचा आनंद झाला आणि काहींची नव्याने ओळख झाली.

सरांनी त्यांच्या पुस्तकात त्यांच्या आयुष्यातील नेहमीचेच प्रसंग चितारलेले आहेत..आपल्याही आयुष्यातील नेहमीचेच प्रसंग पण आपण त्याकडे सजगतेने, वेगळ्या दृष्टीकोनातून पाहिले की तेच आपल्याला वेगळे दिसू लागतात. कधी एखाद्या कठीण प्रसंगात, इतकी वर्ष आपण ज्यांना आपले मित्र म्हणवतो, त्यांचाच मुखवटा अचानक गळून पडतो आणि ते आपले हितचिंतक कधीच नव्हते याची जाणीव होते. अचानक एखादी वीज चमकून जावी तसे आपल्याला त्यांच्याविषयी काहीतरी लख्ख दिसून जातॆ..

माझ्याही आयुष्यात असेच काहीतरी घडले होते..मनाला क्लेशदायक ठरणारे असेच काही क्षण घेऊन मी पुढे चालणार होते..माझ्या बाबतीत घडलेल्या प्रसंगानंतर रोजच संपर्क येणा-या त्या व्यक्तीशी मी कसे वागावे सुचत नव्हते..पण अंतरात्म्याचा आवाज आला काही काळासाठी माघार घे..विशेष काही घडले नाही असे भासू दे..यावर काळच याचे काय ते उत्तर देईल..

या प्रसंगानंतर योगायोगाने ओक सरांचाही 'माघार' या शब्दाचे सामर्थ्य दाखवणारा लेख वाचनात आला. त्यांनी आपल्या लेखात लिहिलंय "माघार ही हार नसते. माघार ही मिटून संपल्याची साक्षही नसते. माघार म्हणजे मागासलेपण नव्हे आणि माघार म्हणजे 'सीदन्ति मम गात्राणि, मुखंच परिशुष्यति' म्हणून गाळलेलं अवसानही नव्हे. माघार अवसानघातकी नसून अवधानी चाणाक्षतेची चुणूक आहे, असं माझ मत आहे. माघार म्हणजे पराभव नव्हे तर लांबणीवर टाकलेला विजय आहे."

लेख वाचून झाल्यावर अचानक काहीतरी सापडल्यासारखं वाटलं...वाटलं आपला निर्णय योग्यच होता. माझ्याही बाबतीत घडलेल्या प्रसंगात त्या व्यक्तीला तिची चूक कळली असली तरी तिच्याकडे मनाचा एवढा मोठेपणा नव्हता की तीने आपली चूक कबूल करावी..मी तिच्याशी पूर्वीसारखीच सांघिक भावनेने वागते, तिच्या कामातील अडी-अडचणीत मदत करते..ती ही संवेदनशील असल्याने तिलाही आमच्यात वाढलेलं अंतर जाणवतं आणि माझ्याबरोबरच्या प्रत्येक प्रसंगात ती कणाकणाने पराभूत होत जाते.

असो, स्वतःविषयी खूप झालं..आता सरांच्या पुस्तकाविषयी...सरांचे सर्वच लेख छान आहेत, त्यातही 'मन्या' या बोक्याबद्दलचा लेख 'म्यांव', लीलावेली अम्माचा लेख 'सुंदर वृद्धत्व', 'साहब का करे? असेच इतरही लेख मनाला भिडतात..आपल्याला अंतर्मुख करतात..

मी वाचलं, वाचल्यावर सवयीनुसार लेकीलाही सांगितले..या लेखांमधून K.E.M. हॉस्पिटल आणि त्याच्या आसपासचा परिसर तिच्या नेहमीच्या पाहण्यातला..याच वर्षी तिला G. S. Medical college ला 'फ़िजिओथेरेपीला' admission मिळालं..डॉ. संजय ओक आधी लेखक म्हणून आणि आता संचालक (वैद्यकीय शिक्षण, प्रमुख रुग्णालये)-के.ई.एम. म्हणून त्यांच्याविषयीचा आदर अधिकच दुणावला..

सरांनी अनेक गरीब आणि गरजू लोकांच्या वैद्यकीय मदतीसाठी 'Poor Box Fund' ला आपल्या पुस्तकांच्या विक्री-मानधनातून मिळणारी सर्व रक्कम देणे, त्यांची साईट पाहिल्यावर जाणवणारे त्याचे मोठेपण ..त्यांच्याकडे चालत आलेले अनेक मानमरातब..त्यांनी मिळवलेल्या अनेक पदव्या, त्यांच्या कार्याची शासनाने घेतलेली दखल, अनेक बक्षीस, मा. श्री. अब्दुल कलाम यांच्या हस्ते स्वीकारलेला सन्मान आणि या सर्वापेक्षाही शब्दात कधीच न मांडता येणारे, त्यांना मिळालेले लोकांचे शुभाशीर्वाद..

त्यांचा ' Rope walk' लेख वाचून संध्याकाळी लेकीशी बोलताना तिला तिच्या अभ्यासासंदर्भात 'डोंबा-याच्या मुलीचे' उदाहरण दिले..सरांनी लिहिलंय " हा rope walk' च अस्तित्वाची लढाई आहे..दोरीचं दुसरे टोक गाठलं तर चार टाळया आणि आठ-बारा आण्यांची बक्षिशी आहे. आणि दुर्दैवाने लक्ष विचलित झालं, तोल गेला आणि पडून पाय मोडला तर...म्हणून जनहो कितीची गोंगाट होऊ दे; बसचा हॉर्न, रिक्षाचा भोंगा, पाठीमागच्या इमारतीचा slab टाकणारे मशीन या सगळ्याच्या पलीकडे डोंबारी-कन्येला दिसतंय ते फक्त दोरीचं दुसर टोक; आणि कानावर पडताहेत ते बापाने वाजवलेले चामड्याच्या हलगीवरचे कडाडणारे बोल..

तिला म्हटले तुलाही असाच अभ्यास करायचा आहे..अनेक प्रलोभन तुझ्या वाटेत येतील पण तुला तिकडे दुर्लक्ष करीत आपलं लक्ष्य गाठायचंय...तिला माझ बोलण पटत गेल्याची साक्ष तिच्या डोळ्यात दिसली आणि एक चांगले पुस्तक वाचल्याचे समाधान मनात उमटले..

सरांची website : www.sanjayoak.com


सौ. रत्ना संजय हिले
कल्याण (डी. ओ. १७०५००)

२.१२.२०११

पुन्हा नव्याने बहरण्यासाठी...

अरे! हा सोनमोहर इतका कधी फुलला? मला कळलं कसं नाही ? मान्य आहे तो आमच्या सोसायटीतच पण रहदारीच्या विरुद्ध दिशेला आहे पण तरीही दरवर्षी माझं लक्ष असायचं त्याच्या फुलण्याकडे...याच वर्षी असं का बरं झालं..मनातल्या मनात मला माझाच राग येत होता कारण त्याला हळुवारपणे फुलताना पाहणं खरच खूप आनंददायी असायचं...आणि नेमकं तेच राहून गेलं..

सुरुवातीला एक दोन फांद्यावर उमलणारी दोन चार हळदी पिवळ्या रंगाची फुलं वसंत आल्याची वर्दी देत फुलायची...वा-यावर झूलणा-या हिरव्यागार पानांमध्ये उठून दिसायची.. काही काळाने एक एक फुल फुलत फुलत पूर्ण झाड हळदुल्या रंगात न्हाऊन निघायचे..आपल्या बाळाला मोठं होताना पहावं तसा आनंद असायचा..हे सगळं आठवून मन खट्टू होऊ लागलं..मनात विचार आला की नेहमीच्या चक्रात मी इतकी बांधली गेले की आपल्या आजूबाजूला काय चाललंय याची आपल्याला गंधवार्ताच नसावी ?


मनाशी असंच काहीबाही बोलताना आतून आवाज आला अगं, जगाचा विचार करतेयस..कधी स्वतःचा विचार केलास का? स्वतःसाठी कधी वेळ काढलास का ? स्वतःशी असं शेवटचं कधी बोललीस?
मीही माघार न घेता कशीतरी म्हणाले, "मग..मी..काढला ना माझ्यासाठी वेळ...तुला नाही आठवत? मागच्या पावसाळयात नाही का 'कास; ला जाऊन सुंदर फुल पाहून आले..
अजून..
अजून मागच्या रविवारी नाही का ;विजया वाड' बाईंचा 'चला आनंदाने जगूया' हा छान कार्यक्रम पाहिला..आणि..आणि हो..मधल्या काळात काही फुटकळ सिनेमे...काही मालिका..आणि...
आणि..
नाही अजून काही नाही...मी मनाच्या प्रश्नांपुढे केव्हाच हरले होते..

लेकीने भू भू च्या एका आजारी पिल्लाला गच्चीवर ठेवलंय..ती क्लास ला गेली होती आणि तिला यायला उशीर होणार होता म्हणून त्याला वर जाऊन पाणी पाजलं..बिस्कीट खाऊ घातलं आणि ब-याच दिवसांत गच्चीवर न आल्याने गच्चीवर सहज एखादी फेरी मारावी म्हणून गच्चीच्या कडेला आले तर हे ’सोनमोहर महाराज’ दुपारच्या तळपत्या उन्हात हिरव्या पिवळ्या रंगात रंगून दिमाखात उभे! मला आश्चर्यचकित पाहून तो ओळ्खीच हसल्याचाही मला भास झाला..

त्याचं ते सौंदर्य मी डोळ्यात साठवत राहिले..काहीसं भानावर येऊन घरून पटकन camera आणला आणि झूम करून त्याचे दोन चार फोटो काढले..मनात म्हटल उद्या वसंताबरोबर याचा बहर देखील ओसरेल..पण माझ्या स्म्रुतीत या फोटोंच्या रूपाने तो कायम असाच टवटवीत राहील...

गुगल वर सर्च मारताना या झाडाची शास्त्रीय माहिती वगैरे वाचली होती..हा गुलमोहर family चा असून Botanical name: Peltophorum pterocarpum किंवा इंग्रजीमध्ये त्याच्या तांबूस तु-यांमुळे त्याला copper pod असे काहीसे खडखडीत नाव आहे...त्याला आपल्या इकडच्या भाषांमध्येही वेगवेगळी नावे आहेत..या सर्व वेगवेगळ्या नावांमधून ज्या एका नावाने माझं लक्ष वेधून घेतलं ते नाव म्हणजे 'राधाचुडा'..बहुधा बंगालीत 'सोनमोहाराला' या नावाने ओळखतात..या आधी मी हे नाव कधी कुठे ऐकले नव्हते..पण हे नाव मला भलतंच romantic वाटल..मस्त नाव..

'राधाचुडा' या शब्दाची फोड राधेचा चुडा किंवा तिची काकणं अशी असावी का? असं असेल तर राधेच्या सुकुमार गो-या हातात राजवर्खी हिरवा आणि सोनपिवळया तेजस्वी रंगाचा चुडा..खरच मस्त कल्पना..आता कल्पनेचा वारू मोकाट सुटलाच आहे तर तिच्या कानात सोनमोहराच्या फुलांचे डूल, याच फुलांचा गळ्यात हार, पायांत पैंजण आणि वा-याच्या मंद झुल्यावर झोके घेत खाली येऊन तिच्या रेशमी केसांत विसावलेली खुपशी सुवर्णपुष्प...मला तर माझ्या कल्पनेतली ही राधा कृष्णाच्या बासरीच्या सुरांत विरघळून फुलांच्या रूपाने वा-यावर आनंदाने डोलताना दिसूही लागली...

विषयांतर झालं पण या सोनमोहराचं आणि माझं नातं तसं जुनंच..अनेक सुंदर क्षण मी याचा सोबतीने जगले..अनेक स्वप्नांची फुलपाखरं याच्या सोबतीने भिरभिरली आणि कित्येक स्वप्न निर्माल्यासारखी याच्या पायथ्याशी पडलेल्या फुलांच्या गालिच्यात हरवूनही गेली...

हा आपला प्रत्येक वर्षी नव्या उमेदीने बहरतो आहे...आनंद देतो आहे...परत नवी स्वप्ने पहा...नवी स्वप्ने जगा असं सांगण्यासाठी धडपडतो आहे...मी ही माझ्या अपूर्ण स्वप्नांना त्याच्या पायथ्याशी टाकून त्याची दोन फुले हातात घेते आणि त्याच्या सत्कृत्याला, धडपडीला मनोमन सलाम करत, नव्या स्वप्नांचं स्वप्न घेऊन पुन्हा माझ्या विश्वात परतते...पुन्हा नव्याने बहरण्यासाठी...
पुन्हा नव्या उमेदीने जगण्यासाठी...

(सौ. रत्ना हिले)
कल्याण D.O.-१४१८०० - ९८२०७७९६७२

**********************************************************************

प्रतिक्रिया :
अतिशय सुंदर लेख !

प्रसाद साखरकर - MRO IV, मुंबई
--------------------------------------------------
नमस्कार रत्नाजी ,
लेखणी उत्तम सरसावलेली आहे . निसर्गाशी तादात्म्य पावण्यासाठी झुरणारी सुप्त इच्छा सत्वगुणाचे प्रतिनिधित्व करते . वसंत ऋतूप्रमाणे आपल्या लेखणीतील सरस्वती चिरतरुण राहो ही शुभकामना.

जय जय रघुवीर समर्थ ...

ओंकार नेर्लेकर, पुणे
----------------------------------------------------
तरल सुंदर...गंध निरंतर..दरवळून हे मिटते अंतर...
सदा उमलो ( लेखणीतला )...गुलमोहर...

संतोष वायचळ - कल्याण
-----------------------------------------------------
निसर्गातील बदलाकडे इतक्या सकारात्मक दॄष्टीने बघणं आणि ते बदल संवेदनशीलतेने टिपून तितक्याच तरलतेने शब्दबद्ध करणं...निसर्ग देवतेचा वरदहस्त तुझ्या मस्तकी असल्याचा हा पुरावाच नाही का ? तुझ्यामुळे ऋतू ल्यायलेली राधा मीही बघू शकले...

वीणा पाटणकर - कल्याण D.O. 141800
------------------------------------------------------
आपल्यातीलच एक सहकारी उत्स्फूर्त बोलते, वातावरण प्रसन्न करते हे ऐकले, अनुभवले आहे, पण सोनमोहराच्या माध्यमातून केलेली ही वसंत ऋतूची ओळख लाजवाब...नुसतं वाटून उपयोग नसतो..लेखणीतून उतरलं त्याचं मोल जास्त..Bravo...Smile

सौ. वैदेही फाटक - कल्याण D.O. 141800
------------------------------------------------------
सोनमोहराशी हितगूज मनाला रानावनात घेऊन गेलं..खरच आपण किती दुर्दैवी...निसर्गापासून खूप दूर...किती दूर सांगता येत नाही...शब्द तोकडे पडतात..पण असं हरवणं माणसाला माणूसपण देतं..मनाला आनंद देतं...जगण्याचा अर्थ सांगतं... जाउ दे..शब्दच ते..कमी पडणारच...

असो, अशीच हरवत जा...जग सुंदर आहे नाही ? आपण डोळसपणे कधी पाहणार ?

श्री. श्रीरंग दाते - निवृत्त अधिकारी - कल्याण डी.ओ.-१४१८००