Sunday, February 1, 2015

'साहित्य उद्यान' हा मोठा सन्मान - मधु मंगेश कर्णिक

आतापर्यंत आयुष्यात मी ऐंशी - नव्वद पुस्तके लिहिली, परंतु माझ्या हयातीत माझ्यावरच लिहिलेले पुस्तक म्हणजे माझ्या नावाने ओळखले जाणारे हे उद्यान आहे. राष्ट्रपतींच्या हस्ते मिळालेल्या पद्मश्री पुरस्कारापेक्षा हा सन्मान मोठा आहे, अशा भावना ज्येष्ठ साहित्यिक व कोकण मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांनी व्यक्त केल्या. 

अंबरनाथ नगरपालिकेतर्फे साकारण्यात आलेल्या पद्मश्री मधु मंगेश कर्णिक साहित्य उद्यानाच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. कल्पकता, योजकता यांचा सुरेख मिलाफ साधत साकार केलेले हे उद्यान खूप सुंदर असून हा माझा अपूर्व व अभूतपूर्व सत्कार आहे. त्यामुळे मी आजन्म अंबरनाथकरांचा ऋणी राहिन, असेही ते म्हणाले. 

ठाणे जिल्ह्य़ाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, कार्यक्रमाचे आयोजक सुनील चौधरी, आमदार बालाजी किणीकर ज्येष्ठ कवी रामदास फुटाणे, अशोक नायगावकर, अरुण म्हात्रे, महेश केळुस्कर, शाहीर संभाजी भगत, किरण येले, प्रदीप ढवळ, शशिकांत तिरोडकर, दिनेश बावरा आदी साहित्यिक मंडळी व राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. 

उद्यानात रंगले कविसंमेलन

उद्यानाचे उद्घाटन झाल्यानंतर तिथे कविसंमेलन रंगले. कविसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या रामदास फुटाणे यांनी त्यांच्या पहिल्याच कवितेतून 'भारत व इंडिया' यातील फरक उलगडला. आपल्या पहाडी आवाजात शाहीर संभाजी भगत यांनी 'माझे गं माय', 'जीव एकटा एकटा' हे पोवाडे सादर केले. 'इथे दूर गावात भारून आली' ही महेश केळुस्करांची कविता आणि 'छातीत फुले फुलण्याची वेळ निराळी होती' 'महाराष्ट्राच्या इतिहासातील एक केशरी लाट' ही बाळासाहेबांवरची कविता अरुण म्हात्रे यांनी सादर करत उपस्थितांची मने जिंकली. नेहमीप्रमाणेच आपल्या वेगळ्या शैलीत कविता सादर करत अशोक नायगावकर यांनी सर्वांनाच पोट धरून हसवले. त्यांच्या 'टिळक तुम्ही चौपाटीवर कशासाठी उभे आहात' आणि 'गळ्याशी नख खूपसून' या दोन कविता अंबरनाथकरांची दाद मिळवून गेल्या.

असे आहे साहित्य उद्यान

* पद्मश्री मधू मंगेश कर्णिक साहित्य उद्यानात मराठी साहित्यातील शंभर साहित्यिकांवरील लेखनांश व माहिती मिळणार आहे. 
* बाल साहित्य, किलबिल कट्टा तसेच भारतरत्न व ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्यांचीही माहिती येथे मिळणार आहे. 
* त्याचबरोबरीने व्यंगचित्रे, साहित्यिकांची छायाचित्रांसह यादी या उद्यानात पहावयास मिळणार आहे. 
* अत्यंत प्रशस्त असलेल्या या उद्यानात छोटेखानी कार्यक्रमांचे आयोजनही करता येणार आहे. 
* उगवत्या पिढीला मराठी साहित्य व साहित्यिकांचा परिचय व्हावा या हेतूने या उद्यानाची अंबरनाथ नगरपरिषदेतर्फे निर्मिती केल्याचे नगराध्यक्ष सुनिल चौधरी म्हणाले.

आभार : लोकसत्ता 
















Saturday, January 24, 2015

मराठी वाड्मय मंडळाच्या कल्याण शाखेचे उद्घाटन !

दिनांक २१.१.२०१५ रोजी मराठी वाड्मय मंडळाच्या कल्याण शाखेचे,  कल्याणचे Divl. Manager श्री. किशोर मोहिते यांच्या शुभ हस्ते उद्घाटन झाले..त्या निमित्ताने मराठी वाड्मय मंडळाने दिलेल्या पुस्तकांचे अनावरण करण्यात आले...आमच्या या प्रयत्नांमध्ये मराठी वाड्मय मंडळाचे मुख्य कार्यवाह श्री. किरण येले यांची मोलाची मदत लाभली..आमच्या कल्याणच्या सर्व सहका-यातर्फे त्यांना आणि मंडळाला खूप खूप धन्यवाद !

या ऐतिहासिक क्षणाची काही क्षणचित्रे !





मराठी वाड्मय मंडळातर्फे संक्रांतीच्या तिळगुळाचे वाटप

मराठी वाड्मय मंडळातर्फे संक्रांतीच्या तिळगुळाचे वाटप कल्याण आणि भिवंडी शाखेत पार पडले..त्यांची काही क्षणचित्रे...






भिवंडी शाखा




Sunday, January 18, 2015

गीता धर्म मंडळ आयोजित - गीता 'संथा' वर्ग


आता सध्या शनिवार, रविवार खूप धावपळीचे असतात..घरात साचलेली आठवडाभराची कामे आणि संध्याकाळी चार वाजता संस्कृतमध्ये गीता ऐकून म्हणण्याचा, अर्थ शिकून घेण्याचा क्लास...या जानेवारी २०१५ च्या १० आणि ११ तारखेपासून हा क्लास सुरु झाला..

आम्हाला शाळेत संस्कृत हा विषय नव्हता..पण लहानपणापासूनच संस्कृतचे आकर्षण होते...कधी काळी मी देखील संस्कृत मध्ये श्लोक म्हणू शकेन किंवा त्यांचा अर्थ समजू लागेल असे वाटले नव्हते..पण म्हणतात ना कि कुठल्याही चांगल्या गोष्टीची कामना केली कि ती योग्य वेळी पूर्ण होतेच.

आमचा हा वर्ग शनिवार आणि रविवार दोन दोन तासांचा एक वर्षभर होणार आहे..या क्लास ची कल्याण मध्ये नुकतीच सुरवात झाली आहे..आमची ही दुसरी batch..

मैत्रिणीसोबत आधीच्या batch च्या बक्षीस समारंभाला गेले होते..तेथील विद्यार्थ्यांचा वयोगट होता वय वर्ष ८ ते ८०..बहुतेक सर्वांनी पाठांतराची आणि इतर बक्षीसे मिळवली होती...संसारात अडकलेल्या किती जणींनी एक नवा आत्मविश्वास मिळवला होता..स्वतःला नव्याने शोधले होते...बक्षीसे स्वीकारताना त्यांना होणारा आनंद त्यांच्या डोळ्यांतून,  चेह-यावरून दिसत होता..

आमचा क्लास कल्याणच्या टिळक चौकातील लक्ष्मी-नारायण मंदिरात होतो..हे मंदिर कल्याण गायन समाजाच्या समोर आहे...मंदिरात असे काही शिकण्याची ही पहिलीच वेळ आहे..छान वाटते...क्लास ची काही फी नाही पण मिळणारे ज्ञान अमुल्य आहे..

असे वाटते की आम्हाला 'गीता' शिकवण्यासाठी लाभलेल्या 'फडके madam' खरोखरच एक ऋषी असाव्यात आणि 'संथा' पद्धतीने शिकणारे आम्ही सगळे त्यांचे गुरुकुलातील विद्यार्थी असावेत..श्लोक शिकताना होणारा एक नाद, एक लय वातावरण भारून टाकते..

'संथा' पद्धत म्हणजे समोरच्या गुरूने श्लोक म्हणणे आणि आपण ऐकून ते योग्य रीतीने, गतीने, लयीत, योग्य शब्दावर आघात, विरामचिन्हे, व्याकरणाचे नियम पाळून ते म्हणणे...madam श्लोकांचा खूप छान अर्थ समजावत आमच्याकडून ते पुन्हा पुन्हा आम्हाला म्हणणे जमेपर्यंत म्हणवून घेत असतात...

हे शिकवताना आम्हाला एक वेगळा दृष्टीकोन असा दिला की मुळात शंभर कौरव हे प्रतीकात्मक आहेत...या माणसाच्या शंभर वाईट वृत्ती आहेत आणि त्या वृतींची नावे ही कौरवांची आहेत..पाच पांडव ह्या देखील वृत्ती आहेत...चांगल्या वृत्ती...ह्या सर्वांनी मिळून बनते आपले आयुष्य...आणि या सर्वावर अंकुश ठेवणारा तो योगेश्वर म्हणजे आपली सद्सद्विवेकबुद्धी...आपण संभ्रमात असतो तेव्हा आपल्याला योग्य मार्ग दाखवणारा तो योगेश्वर...

व्यासमुनी जर म्हणाले असते की या लोकहो,  मी तुम्हाला तत्वज्ञान सांगतो तर किती जणांनी ते ऐकले असते...पण  त्यांनी पात्र निर्मिती केली आणि तत्वज्ञानात नाट्य आणले...आज गीतेची निर्मिती होऊन ५१५१ वर्षे झाली आहेत पण त्यातील नाविन्य आजही तसेच आहे...आपल्याच देशात नाही तर इतरही देशात तिचा अभ्यास केला जातो..तेव्हा एक अभ्यास म्हणून मी हा क्लास join केला...

हा क्लास पुण्याच्या गीता धर्म मंडळ या संस्थेने सुरु केला आहे..कल्याण मधील हा एकच क्लास आहे..पुण्यात आजमितीला ५१ ठिकाणी हे वर्ग चालतात...गेली ८८ वर्षे हे मंडळ ‘गीताधर्मा’च्या प्रचाराची आणि प्रसाराची निरलस जनसेवा करीत आहे...

त्यांचे ध्येय : श्रीमद् भगवतगीतेत सांगितलेल्या आणि लोकमान्य टिळकांनी, 'गीतारहस्या'त प्रतिपादन केलेल्या, कर्मयोगाच्या प्रसाराने, भारतवर्षाच्या राष्ट्रधर्माची सर्वांगीण उन्नती करणे, 
आणि
धोरण - अनेकानेक साधनांनी, गीतेतील कर्मयोगाचा अर्थात राष्ट्रीय धर्माचा, प्रसार व प्रचार करून, लोकशिक्षणाच्या माध्यमातून, सर्वांगीण राष्ट्रोंन्नती साधणे, म्हणजेच राष्ट्राचा अभ्युदय आणि नि:श्रेयस साधणे.

मला खूप आनंद आहे की मी या उपक्रमाचा लाभ घेऊ शकले..
अधिक माहितीसाठी वेबसाईट चा पत्ता :
http://geetadharmamandalpune.org/index.htm

Friday, January 16, 2015

आनंद


आज दुपारी १५.१.२०१५ कंपनीच्या मुख्य कार्यालयात मराठी वाड्मय मंडळाची सभा झाली. त्यात 'आमच्या कल्याण शाखेला वाड्मय मंडळाकडून पुस्तके मिळावीत अशा मागणीची आठवण पुन्हा एकदा किरणजींना करून दिली...

त्यानी लगेचच निर्णय घेऊन तुम्हाला आता नेता येतील तितकी पुस्तके ग्रंथालयातून घेऊन जा असे म्हणून एक सुखद धक्का दिला, पुस्तक निवडीमध्ये ही त्यांनी मदत केली आणि मी ११ पुस्तके घेऊन आनंदात परतले..

मी आज खूप आनंदात आहे..माझे २००८ पासूनचे जे स्वप्न होते कि ' ' माझ्या कार्यालयातील सहका-यांना वाचण्यासाठी चांगली पुस्तके मिळावीत ' ते आज पूर्ण झाले...हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत करणारे श्री. किरणजी आणि ग्रंथपाल श्री. सुशील शिंदे यांचे आम्हां कल्याणच्या सर्व सहका-यांतर्फे खूप खूप आभार..


Thursday, January 8, 2015

अंबरनाथमध्ये साहित्य उद्यान - लोकसत्ता - ठाणे वृतांत

आजच्या (८.१.२०१५) लोकसत्ताच्या ठाणे वृतांत मधे आलेली बातमी...

पालिकेच्या माध्यमातून अंबरनाथ पूर्व विभागात खास साहित्य कला उपक्रमांसाठी विशेष उद्यान विकसित करण्यात आले असून, जानेवारीच्या अखेरच्या आठवडय़ात त्याचे लोकार्पण केले जाणार आहे.

हुतात्मा चौकातील एका पडीक बगिच्यात हे उद्यान साकारण्यात आले असून त्याला पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांचे नाव देण्यात आले आहे.

अंबरनाथमध्ये राहणारे कवी-लेखक किरण येले यांच्या संकल्पनेतून हे उद्यान तयार होत आहे. त्यात ठिकठिकाणी मराठी साहित्यातील निवडक वेचे आणि ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेल्या लेखकांचा परिचय आहे.

या उद्यानामध्ये नियमितपणे साहित्य कट्टा भरविला जाईल. शहरातील विविध संस्थांना साहित्य तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी हा कट्टा विनामूल्य उपलब्ध होईल. ज्येष्ठ नागरिकांना सकाळ-संध्याकाळ फिरता यावे म्हणून येथे हिरवाई जोपासण्यात आली आहे.

विशेष म्हणजे उद्यानाच्या कठडय़ांचे सुशोभीकरण करण्यात आले असून, त्या जागेचा वापर विद्यार्थ्यांना अभ्यासिका म्हणून करता येईल, अशी माहिती नगराध्यक्ष सुनील चौधरी यांनी दिली.

आभार : लोकसत्ता 

Bappa - by Geetesh Shinde

काव्य-चर्चा




डॉक्टर मोहंमद शकील जाफरी
प्रा. श्री गीतेश शिंदे




परवा रविवार दिनांक ४.१.२०१५ ला सकाळीच आमच्या कंपनी मधील सहकारी श्री. किरण येले यांच्या मेसेज आला की आज दुपारी चार वाजता काही कवी काव्य-चर्चेसाठी अंबरनाथला येणार आहेत. मेसेज वाचल्यावरच खूप आनंद झाला आणि मी या चर्चेत सहभागी होऊ शकते का हे विचारल्यावर 'नक्की या' असे सांगितले..

दुपारी वेळेत पोहचायचे तर घरची कामे भराभर आवरणे गरजेचे होते..मैत्रिणीला फोन केला..तिलाही साहित्याची आवड..तीही येते म्हणाली...सगळे आवरून गाडीने मी, माझे पती आणि मैत्रीण असे तिघे वेळेत कल्याणहून अंबरनाथ ला पोहचलो.

तेथे सगळे हळूहळू जमले... कवितेच्या ओढीने कोणी दादर, ठाणे, वसई तर एक कवी थेट मंचर (पुणे) येथून आले होते...माझ्यासाठी एक किरण जी सोडले तर इतर सगळे अनोळखी होते...ते सगळे एकमेकांना ओळखत होते..What's App च्या group चे ते सगळे सभासद होते...सर्वांनी आपला परिचय करून दिला त्यामुळे वातावरण मोकळे होण्यास मदत झाली..

मग कविता या साहित्य प्रकारापासून समाज दुरावत चाललाय..तेव्हा तिलाच कसे लोकांपर्यंत पोहचवता येईल..जसे कार्यक्रमातून, दिनदर्शिकेतून किंवा इतर माध्यमातून या विषयी सर्वांनी आपापली मते मांडली..यासाठी काय उपक्रम राबवता येतील याविषयी देखील चर्चा झाली...

येथे आलेले प्रा. श्री गीतेश शिंदे हे विद्यालंकार college मध्ये भौतिकशास्त्र शिकवतात...ते 'कविता पानोपानी' हा कार्यक्रमही करतात..U Tube वर यांचे काही videos देखील आहेत..त्यांच्या 'निमित्तमात्र' या कवितासंग्रहाची नुकतीच दुसरी आवृत्ती प्रकाशित झालेली आहे..त्यात मुक्तछंद काव्यप्रकारासोबतच 'त्रिवेणी' म्हणजे तीन ओळीत कवितेचा आशय मांडण्याचा नवीन प्रयोग केला आहे..

तिथे आलेल्या योगिनी mam या स्त्री-मुक्ती चळवळीशी संबंधीत कार्य करतात आणि 'ललकारी' नावाचे नियतकालिक ही चालवतात..

यात विशेष लक्षात राहिलेले ते कवी म्हणजे डॉक्टर मोहंमद शकील जाफरी उर्फ शकील मंचरी..त्यांनी पीएच. डी (रोमन उर्दू)-२०१४ आणि डी. लिट(हिंदी) - २०१४ केले आहे...त्यांचे १९८८ पासून  सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक, सांस्कृतिक आणि मुक्त पत्रकारिता या क्षेत्रात सक्रिय सहभाग घेतला आहे..अंधश्रद्धा निर्मुलन, व्यसनमुक्ती, एड्स जनजागृती, पर्यावरण आणि राष्ट्रीय सलोखा इत्यादी विषयांवर व्याखाने आणि लेखनाद्वारे जनजागृती केली आहे...

त्यांना स्थानिक, तालुका, जिल्हा, राज्य, राष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील १५० पुरस्कार प्राप्त झालेले आहेत..जसे :
भारतीय समाज विकास अकादमी, मुंबई, Pride of Nation Award 2007, International Human Rights Justice Federation, Satara - A world Human Right Social Award 2013 & Non-Violence International Award 2014, इत्यादी..
त्यांचा  'हे प्रेषिता' हा मराठी काव्यसंग्रह...(आगामी प्रकाशने - पाषाण हृदय-(हिंदी - काव्यसंग्रह), शेवाळ - (मराठी काव्यसंग्रह), मट्टीमनिषी - (तेलगू काव्यसंग्रह), गोहरे अनवार - (उर्दू लेखसंग्रह), Turn back to your Lord - (प्रबंध अनुवाद - इंग्लिश) इ. साहित्य प्रकाशित होणार आहे..

इतरही लोकांचा त्यांच्या गुणवैशिष्ट्यासह परिचय झाला पण त्यांची नावे लक्षात राहिली नाहीत..पुढच्या भेटीत नक्की लक्षात राह्तील..सगळ्यांनी आपल्या स्वतःच्या किंवा आवडलेल्या कविता सादर केल्या..मी देखील माझ्या दोन कविता वाचल्या..

मधे थोडा वेळ अंबरनाथचे नगराध्यक्ष 'श्री. चौधरी साहेब' वेळात वेळ काढून आमच्याशी ओळख करून घेऊन थोडे साहित्य, कला याविषयी बोलून गेले..अंबरनाथ मध्ये होणारे सांकृतिक कार्यक्रम, शहराच्या चौका-चौकामधून उभारलेली कलात्मक शिल्पे त्यांच्या सौंदर्यदृष्टीची साक्ष पटवतात...आताही २६ जानेवारीला रसिकांसाठी प्रथितयश कवींच्या काव्यवाचनाचा कार्यक्रम तसेच साहित्यिक उद्यानाचे उद्घाटन असे छान कार्यक्रम होणार आहेत...अंबरनाथ मध्ये होणा-या या उपक्रमांमध्ये श्री. किरण जी यांची मोलाची साथ आहे...घरी गेल्यावर सुद्धा किरण जी यांनी गायलेली त्यांची गजल आठवत राहिली..

अशा प्रकारे त्या दिवशी सर्वांशी झालेली भेट ही फक्त सुरुवात आहे..यापुढे अशा उपक्रमात अजून अजून रसिक सहभागी होत राहतील अशी खात्री आहे...एकमेकांच्या सहवासात अशी एक छानशी संध्याकाळ अनुभवून एकमेकांचा निरोप घेतला आणि सगळे परतीच्या प्रवासाला निघालो..परत लवकरच होणा-या दुस-या भेटीचा आनंद घेण्यासाठी...
---------------------------------

किरण जी यांची सुंदर गजल...

अता मैफली तू जरा स्तब्ध व्हावे
अता धूप मी तू अग्निकुंड व्हावे

अता बांधतो मी पुजा अक्षरांची
अता शब्द माझे समिधा बनावे

रृतू वाहणारे किती मी सहावे
तुझे चंद्र आता कसे सावरावे

किती साठवू मी तुझ्या पानजाळ्या
कितीदा नव्याने तुला आळवावे

तुझी कागदी पावसाळी जहाजे
कधी शांत वाहे कधी हेलकावे

जरी बंद केले तुझे कवडसे मी
कसे आतले हे दिवे मालवावे

तुझे पञ जेव्हा इथे जाळतो मी
धुराड्यातुनी दोन पक्षी उडावे

लिहाया तुला संपले शब्द माझे
अता वाटते की मला तू लिहावे.

( किरण येले )



Saturday, January 3, 2015

सुन्या सुन्या मैफलीत माझ्या....


Special Thanks for U tube for such a wonderful video

एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी...


एखाद्या वठत आलेल्या झाडाला 'नवसंजीवनी' देणारा क्षण कुठला असू शकतो ? 

कदाचित त्याच्या खोडावर नुकत्याच फुटलेल्या एखाद्या नव्या तांबूस -पोपटी, कोवळ्या पालवीचा स्पर्श...उन, वारा आणि त्याची जगण्याची उमेद घेऊन वाहणा-या त्याच्या आतील जीवनरसामुळेच या पालवीतून तो पुन्हा जगू पाहत असेल..

आयुष्याचंही असंच आहे..आपण इतरांच्या सावलीत वाढतो..आपण मोठे होतो आणि इतरांवर सावली धरतो...मग वाटसरू, मग ते आपले आप्त का होईनात, सावलीची गरज संपली की आपापल्या मार्गाने निघून जातात आणि मग झाड उडून गेलेल्या पक्ष्यांची वाट पाहत आणि रिकामी घरटी जपत वाट पाहत राहते...पण हे भावनिक परावलंबीत्व आता सर्वांनी जाणीवपूर्वक थांबवायला हवे आहे...जोपर्यंत आपण आपला आनंद हा दुस-याचे आपल्या आयुष्यात असण्या-नसण्यावर किंवा त्यांच्या ब-या-वाईट वागण्यावर बेतलेला असतो तोवर तुम्ही स्वतःसाठी कधीही जगत नसता...

जोपर्यंत आपण आपल्या अस्तित्वाला आत्मसन्मानाची, स्वाभिमानाची जोड देत नाही तोपर्यंत आपल्या जगण्यावर बाह्य गोष्टींचा प्रभाव हा पडतच राहणार असतो..आपल्या आनंदाचे कारण जोपर्यंत एखादी विशिष्ट परिस्थिती किंवा एखादी व्यक्ती आहे तोपर्यंत आपण मुक्त जगू शकणार नाही किंवा जगात ज्या काही इतर सुंदर गोष्टी आहेत किंवा आपल्या आजूबाजूला आपल्यावर मनापासून प्रेम करणारी माणसे आहेत त्यांच्याकडे आपले कधी लक्षही जाणार नाही...

कधी कधी ही भावनिक स्थिती आणखीनच बिघडत जाते तेव्हा माणूस एकतर आत्मघात तरी करतो किंवा त्या एका निर्णायक क्षणापासून त्याला आत्मभान तरी येते..तो विचार करू लागतो की का जगतोय आपण असे हे कणाहीन आयुष्य..आपली अस्मिता अशी कोणाकडून तरी पायदळी तुडवली जातेय आणि तरी आपण अजूनही परिस्थितीत बदल होईल अशा खोट्या आशेवर जगतोय...

तर सांगायचा मुद्दा हा की तो आत्मसाक्षात्काराचा क्षण म्हणजेच आपल्या आतला जीवनरस पुन्हा वाहू लागल्याचा क्षण...एका जागीच थांबलेल्या आपल्या आयुष्याला गती देणारा क्षण...वठलेल्या झाडावर पुन्हा पालवी फुलण्याचा क्षण...एकदा का हा क्षण आपल्या ओंजळीत प्राजक्ताच्या फुलांचा सुगंध होऊन आला की मनातही शांततेचा प्राजक्त फुलू लागतो आणि त्याची फुले मग आपल्या आयुष्याला शुभ्र रंग गंध देऊन जीवन हळुवार उलगडू लागतात आणि आपण शब्दरुपाने व्यक्त होऊ लागतो...

माझ्या एका अत्यंत आवडत्या गाण्याप्रमाणे मी ही नव्याने म्हणेन...एकाच या जन्मी जणू...फिरुनी नवी जन्मेन मी..

आभार :  U Tube 

I LOVE YOU


Swapnil Bandodkar
U Tube

Friday, January 2, 2015

विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल...


विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल

तुला साद आली तुझ्या लेकरांची
अलंकापुरी आज भारावली
वसा वारीचा घेतला पावलांनी
आम्हा वाळवंटी तुझी सावली
गळाभेट घेण्या भिमेची निघाली
तुझ्या नामघोषात इंद्रायणी

विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल

भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची
उभी पंढरी आज नादावली
तुझे नाव ओठी, तुझे रूप ध्यानी
जिवाला तुझी आस गा लागली
जरी बाप साऱ्या जगाचा परि तू
आम्हा लेकरांची विठू माऊली

माऊली माऊली, माऊली माऊली
माऊली माऊली, रूप तुझे

विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल

चालतो रे तुझी वाट रात्रंदिनी
घेतला पावलांनी वसा
टाळ घोषातुनी साद येते तुझी
दावते वैष्णवांना दिशा

दाटला मेघ तू सावळा, मस्तकी चंदनाचा टिळा
लेऊनि तुळशी माळा गळा ह्या, पाहसी वाट त्या राऊळा
आज हारपलं देहभान, जीव झाला खुळा बावळा
पाहण्या गा तुझ्या लोचनांत भाबड्या लेकरांचा लळा

भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची
उभी पंढरी आज नादावली
तुझे नाव ओठी, तुझे रूप ध्यानी
जिवाला तुझी आस गा लागली
जरी बाप साऱ्या जगाचा परि तू
आम्हा लेकरांची विठू माऊली

माऊली माऊली, माऊली माऊली
माऊली माऊली, रूप तुझे

विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल

चालला गजर जाहलो अधिर लागली नजर कळसाला
पंचप्राण हे तल्लीन आता पाहीन पांडुरंगाला
देखिला कळस डोईला तुळस धावितो चंद्रभागेसी
समिप ही दिसे पंढरी याच मंदिरी माऊली माझी
मुख दर्शन व्हावे आता तू सकल जगाचा त्राता
घे कुशीत गा माऊली तुझ्या पायरी ठेवतो माथा

माऊली माऊली, माऊली माऊली
माऊली माऊली, माऊली माऊली

पुंडलिक वरदे हारि विठ्ठल
श्री ज्ञानदेव तुकाराम
पंढरीनाथ महाराज की जय


आभार : U Tube आणि मंजुषा सावंत (geetmanjusha.com)

नाही कळले कधी...जीव वेडावला...