Monday, March 9, 2009

वाचकांना होळीच्या/रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा..


मराठी वाड्मय मंडळातर्फे आपल्या सर्व वाचकांना होळीच्या/रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा..

आयुष्य खूप सुंदर आहे...

आयुष्यातील सर्व रंगांचा आनंद घ्या आणि इतरांनाही द्या..

आनंदात जगा..

Saturday, March 7, 2009

लेकीचा पहिला पेपर...


६.३.२००९

आजचा दिवस माझ्यासाठी खूप महत्वाचा होता. आज लेकीचा दहावीचा पहिला पेपर झाला.. ज्या परिक्षेची गेले वर्षभर वाट पाहिली तीच ही परीक्षा..घरातल्या सगळ्याची परीक्षा घेणारी परीक्षा.. तिच्यासाठी गेला महिनाभर घरी असल्याने जगाशी जणू संपर्कच तुटला होता..फ़क्त ती आणि मी दिवसभर हेच आमचे भावविश्व..पण यामुळे बहुतेक एक झालं आम्ही एकमेकींच्या खूप जवळ आलो..ती relax व्ह्यायच्या वेळेत आम्ही गप्पा मारल्या..ती म्हणु लागली तू नुसती माझ्या सोबत बस माझा अभ्यास होईल..आधी मी तिच्या सोबत असले की तिचा अभ्यास होत नाही असं ती म्हणायची.. चला काहीतरी वेगळे, काहीतरी positive घडत होते..चांगले आहे..

पेपरला निघायची वेळ झाली तशी तीने बाप्पाला, आम्हाला नमस्कार केला..तिच्या हातावर दही-साखर घातली..आशीर्वाद..शुभेच्छा दिल्या आणि निघालो..खरं तर आज मी ऑफिसला जाणार होते पण मनातून वाटत होते की तिच्या आयुष्यातील ह्या परिक्षेच्या मोठया क्षणी आपण तिच्या जवळ असावे..तिच्या मोठे होण्याच्या काळातील किती क्षण मी miss केले असतील याची गणतीच नाही..निदान हा क्षण तरी miss करता कामा नये..

तिचे सेंटर 'आदर्श हिंदी विद्यालय' ही शाळा अगदी रस्त्याला लागुनच आहे..त्यामुळे नेहमीची रहदारी, त्यात दहावीची मुले आणि प्रत्येकी एक/दोन पालक, तसचं सकाळच्या इतर शाळातील मुलांना लवकर सोडून दिल्याने रस्त्यावर खूप गर्दी झाली होती, अगदी गाडी पार्क करायला ही जागा उरली नव्हती..थोड़े पुढे जाउन गाड़ी उभी केली आणि शाळेसमोर उभ्या असलेल्या गर्दीचा आम्हीही एक भाग झालो..

सर्व पालक, मुलं सर्वांवर एक प्रकारचा ताण जाणवत होता..माझ्याही ह्रुदयात धडधड होतेय की पोटात दुखतय हे काहीच कळत नव्हतं..पण तसं काही दिसू न देता लेकिलाच म्हणत होते की बाळा tension वगैरे काही घेऊ नकोस..व्यवस्थित पेपर लिहिशील वगैरे..

अकराचा पेपर होता..साडे दहाला ते भलं मोठं उंच लोखंडी गेट उघडलं आणि या पिल्लांना आत घ्यायला सुरुवात झाली..तशी एकच गड़बड़ उडाली, सर्वांना आत जायची जणू घाई झाली..सगळीकड़े Best of Luck आणि पालकांच्या न संपणा-या सूचनांचा गोंधळ सुरु झाला..मुलांना मात्र सूटल्यासारखे वाटत होते..उघडलेल्या गेटमधून ती पिल्लं मात्र चिवचिवाट करत घाईघाईने कधी दिसेनाशी झाली ते कळ्लेच नाही..

सेंटर पासून पालकांनी ५०० मीटर्स पर्यंत लांब थांबावे असा नियम आहे..तरीही आम्ही सगळे त्या गेटला अगदी चिकटून उभे होतो..आम्हाला वर वर्गात जाऊ दिले नाही हे एक बरे झाले नाहीतर प्रत्येकाने आपल्या बाळाला बेंचवर बसवून, पुरेशा सूचना देऊन, आपल्या मनावर दगड ठेउन त्यांना सोडून खाली उतरेपर्यंत पेपर सुरु होउन अर्धा/एक तास उलटून गेला असता..

आता शाळेच्या खाली गेटच्या अलीकडे आम्ही आणि पलिकडे पोलिसकाका असे फ़क्त दोनच parts उरले होते..एव्हाना लेकरं आपआपल्या जागांवर पोहचुन नंबर शोधून खिडक्यांकड़े परत आली होती..टाटा करत होती..हे लक्षात आल्यावर परत पालकांची सैरभैर अवस्था..आपलं पिलू कुठाय..आमचंही बागडत आलं..टाटा करून गेलं..थोडया वेळाने supervisor वर्गात आलेले दिसले..वर्ग शांत होत गेला..पेपर वाटले गेले..बार कोड नंबर, विषय सगळे लिहायचे असते..हळुहळु अकरा वाजले तसे पेपर लिहिण्याची बेल वाजली..आणि पेपर सुरु झाला..आम्हीही सगळे हळुहळु निघायला लागलो..

घरी येता येता लेकीच्याच शाळेतल्या शिशुवर्ग, बालवर्गाच्या छोटया छोटया मुली दिसल्या..लाल चौकडी आणि पांढ-या रेघांचे त्यांचे frock, चिमुकल्या पोनी टेल्स, छोटी छोटी दप्तर, आईचा हात धरून मजेत चालणं..त्यांचाकड़े पाहताना असं वाटलं की काल-परवाचीच गोष्ट आहे ना..रांगा लावून admission फॉर्म घेतला होता..शाळेच्या पहिल्या दिवशी असाच uniform घालून आपण तिला शाळेत घेउन गेलो होतो..शाळा सुटल्यावर घसरगुंडी, आणि इतर खेळायची साधनं तिला खूप आवडायची..लवकर निघायचीच नाही ती घरी..

त्यांच्याकडे पाहताना असं वाटतं राहतं की काळ आपल्यापुरता थांबला आणि ही मुलंच तेवढी मोठी होत गेली..आज शाळेच्या शेवटच्या टप्प्यावर रेंगाळलेले त्यांचे हे निरोपाचे क्षण..आता पुन्हा शाळा नाही.. तो एकमेकांच्या डब्यातला चिमणचारा नाही.. आयुष्याच्या अनेक वाटा..कुठल्या वाटेवर कोण निघून जाईल माहीत नाही..जसे आता मलाही माहीत नाही की माझ्या शाळेतल्या मैत्रिणी कुठल्या वाटांवर निघून गेल्या ते...

साधारण दोन आठवड़यापासून माझा उजवा खांदा, मानेची उजवी बाजू, उजव्या कानामागचा भाग ते थेट डोक्याचा उजव्या बाजुच्या पूर्ण भाग खूप दुखत होता..सहनच होत नव्हतं..खांदा दाबुन दिल्यावर किंवा बाम लावल्यावर थोडसं बरं वाटे पण परत त्रास होई...इथे जवळच अस्थिरोगतज्ञ डॉ. लावणकर यांचे hospital आहे..तिथे त्यांना दाखवले तर त्यांनी थोडया tests केल्या आणि विचारले की तुम्हाला काही stress आहे का..मी म्हणाले "नाही..stress वगैरे काही नाही..आता फ़क्त लेकीच्या परीक्षेसाठी महिनाभर घरी आहे..पण मी काही stress वगैरे घेत नाही..मिस्टरांनाच विचारा..उलट मी हसत वगैरे असले की हेच उलट म्हणतात "परीक्षा आहे..वेळ कमी आहे..जरा serious हो म्हणुन.."..पण माझं म्हणन डॉ.ना पटतच नव्हतं..त्यांनी खुपशा tablets (सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्री खायच्या) लिहून दिल्या, दुखतयं तिथं लावायला मलम दिलं, थोडसं बर्फाने शेकवा म्हणाले, लवकर बरं वाटावं म्हणुन फिजियोथेरिपी सुरु करा आणि stress घेणं बंद करा असे काय काय म्हणाले..या फिजियोथेरिपीने खरोखरच थोडं बरं वाटलं.. तेव्हा आता सध्या hospital च्या वा-या सुरु आहेत..

या काहीशा serious गोष्टीना छेद देणारी अजून एक छोटीशी गोष्ट आज सकाळी घडली..या मोसमाताला कोकीळचा पहिला 'कुहू' आज सकाळी ऐकला..मनात म्हटलं चला 'वर्दी' मिळाली...आता 'वसंताची' पालखी आपल्या दारावरून जाईल तेव्हा आपण स्वागताला तयार असले पाहीजे.. हो नाहीतर 'दुर्लक्ष' केलं म्हणुन उगाच रागवायचा आणि त्याची समजुत काढण्यासाठी उगाच त्याला एक दोन कविता ऐकवाव्या लागायच्या..रसिक आहे तो..माझा सखा..

Sunday, February 22, 2009

देखणं शब्दशिल्प..



१८.२.२००९

श्री. कर्णिक हे असेच orkut वर भेटलेल्या सुह्रुदांपैकी एक…त्यांचं साहित्यावरील प्रेम हा आम्हाला जोडणारा दुवा..

आजच्या त्यांच्या Good Morning च्या मेलमधे त्यांनी एका सुंदर दृश्याचे वर्णन केले आहे..

कामानिमित्त कुर्ला ते CBD प्रवास करताना मधे वाशीची मोठी खाडी लागते..त्या पाण्यावर विसावलेल्या काही पक्ष्यांबद्दल..त्यांच्याबद्दल खूप छान लिहूनही त्यांनी विनयाने म्हटलेलं की हे मला शब्दांत नीट मांडता आलं नाही..तुम्ही चांगलं लिहिलं असतं.." शब्दाशब्दांतून जाणवणारे त्यांचे सुसंकृत मन..

त्यांना पाठवलेल्या reply मधे मी लिहिले की..

Mr. Karnik,

आपण फारच सुंदर वर्णन केले आहे..माझ्या डोळ्यासमोर ते दृश्य अगदी सजीव झाले..पाण्यावर बसलेला पक्ष्यांचा थवा आणि एकच एकटा पांढराशुभ्र पक्षी पाण्यावर उडताना, संथपणे पंख पसरून सुर्याकडे जाताना मला खरच दिसला..

अशावेळी आपण एकटे असतो..भावनांचा कल्लोळ नसतो..आणि असे दृश्य दिसले की आपला जणू या जगाशी संबंध काही काळ का होईना तुटत जातो..असे वाटते हा क्षण इथेच थांबावा..आपल्या मनालाही जणू पंख फुटून आपणही अज्ञाताच्या आभाळाकड़े निघून जातो..

असे हे अंतर्मुख करणारे क्षण फार दुर्मिळ असतात..ज्यांना जाणवतात ते हे क्षण जगतात..मन समृद्ध करतात..खरच खूप छान वाटले...थैंक्स..

यावर श्री. कर्णिक म्हणाले.."मी तर फ़क्त दृश्य पाहिले..पण तुम्ही त्याचे अंतरंग स्पष्ट केलेत..माझ्या मनातील विचारांना नेमका आकार दिलात..अज्ञाताचं आभाळ ह्यातील तुम्हाला अभिप्रेत असलेला अर्थ मला कदाचित समजला नसेल.. पण त्या अज्ञात आभाळाची ओढ़ मलाही आहे..मला काही गोष्टी समजून घ्यायच्या आहेत..आणि त्याकरता मी संत साहित्य जितके वाचता येईल त्याचा प्रयत्न करतोय..

मी तर माती जमवली तुम्ही त्यातून सुंदर मुर्ती साकारून दिलीत…
**************************************************

खरं तर अशी दृश्ये आपण सगळेच पाहत असतो..पण जेव्हा एखाद्या सुंदर भावावस्थेतून अशा अंतर्मुख करणा-या ओळी लिहिल्या जातात तेव्हा एखाद्या साध्या दृश्याचही देखणं शब्दशिल्प मनात कोरलं जातं..जे आपल्याला सतत आनंद देत राहतं.. मनात सुगंधासारखं दरवळत राहतं...

Thursday, February 19, 2009



आज ब-याच दिवसांनी काही ओळी सुचल्या..


खरंच कविता खरी असते की असतो आभास सारा
दुख-या मनावर शब्दांचा उतारा...

कधी चांदणे ती...कधी रणरणते ऊन
कधी मनात वाजते…होउन आर्त धून...

होई कधी ती...एक पाखरू पाखरू
कधी उदास मनाला कशी सावरू सावरू...

कधी तिच्यासाठी माझ्या..ओल्या मनवाटा
कधी रुसल्या शब्दांचा..उरी सले काटा...

माझा श्वासही अखेर..तुझ्या संगतीने जावा
आज अज्ञात प्रदेशी...तुला धाडते सांगावा...


(सौ. रत्ना हिले)

Thursday, February 12, 2009

'पुन्हा भेटशी नव्याने'


साईट वर 'पुन्हा भेटशी नव्याने' हा सेक्शन काही सहज दिसत नाही..आज सहज पाहिले तर प्रसादने त्यांच्या एका 'जिवलगाची' ओळख यात पोस्ट केलेली दिसली..याबाबत त्यांनी मलाही सांगीतले नव्हते...त्यांना सहसा स्वतः केलेल्या कामाबद्दल बोलायला आवडत नाही..त्यांनी या सेक्शन मध्ये पोस्ट केलेली माहिती त्यांच्याच शब्दात...

-------------------------------------------------
श्रीमती प्राजक्ता साखरकर
Written by प्रसाद साखरकर

श्रीमती प्राजक्ता साखरकर या प्रधान कार्यालयात गुंतवणूक विभागात काम करतात. खरं तर ह्यांचा असा अहो जाहो करून परिचय देणं मला जरा कठिण होतय. (माझी बायको आहे ही !) ह्या वेबसाईट साठी खुपच खर्च येणार होता. सर्व मध्यमवर्गीयां प्रमाणे आमचे ही पगारावरच चालते. अशा परिस्थितीत ऐन नवरात्री च्या आधी स्वतःसाठी काही खरेदी करायच्या ऐवजी प्राजक्ताने मला जवळपास २०,०००/- रुपये फक्त माझ्या मराठीवरील प्रेमाला समजुन ही वेबसाईट तयार करण्यासाठी दिले. आज ही वेबसाईट मराठीप्रेमींसाठी सुरू होऊ शकली ती केवळ श्रीमती प्राजक्ता प्रसाद साखरकर यांच्यामुळे.

स्वतःच्या पत्नीचे कौतुक म्हणून नव्हे तर सर्व मित्र-मैत्रिणींना कळावं की ही अशी वेबसाईट फक्त माझ्या अक्कलहुशारीने नाही होत तर तीच्यामागे एका तेजस्वीनीचं बळ आहे. ही वेबसाईट करताना ब-याच वेळा मी हिंमत हारली होती पण पाठिवर आश्वासक हात होता प्राजक्ताचा.

ह्या माझ्या शक्तिला... माझ्या प्राजक्ताला माझा सलाम

------------------------------------------------
प्राजक्ता मैडमचे वेब-साईटतर्फे खूप खूप आभार..
संपादिका - www.mvmnia.com

Wednesday, February 11, 2009

परीचा पडला दगडावर पाय...

परीचा पडला दगडावर पाय,
दगड म्हणाला आय आय,

परी म्हणाली तू तर दगड,

तुला का व्हावी परी जड़,

दगड म्हणाला इथे पहा,

परीला दिसल्या जखमा दहा,

तेव्हापासून सगळ्या परी,

चालू लागल्या अधांतरी....

फार पूर्वी प्रसादने ऐकवलेली ही कविता आज आठवली आणि न्यू इंडिया सेंटर मधले भरभरून जगलेले आणि आता काळाच्या ओघात हरवून गेलेले ते सोनेरी क्षण पुन्हा एकदा आठवले..


Tuesday, February 10, 2009

अजून मला तरी मी कुठे समजलोय?

माझा मित्र किशोर नाशिककरने पाठवलेल्या या ओळी...

अजून मला तरी
मी कुठे समजलोय?
आणि तुला जो समजलोय ना
तो तर केवळ एक थेंब आहे समुद्राचा...

जाताना तेवढाच फ़क्त जपून ने पापणीत
पुढे कधी आटलोच तर
तुझ्याकडून मागुन घेईन...

सुरेल शब्दांचा प्रवास

८.२.२००९

रविवार असला की प्रसादशी निवांतपणे साईट बद्दल बोलता येतं..आठवड़ाभर मनात साचलेले प्रश्न विचरता येतात..आताच फोनवर बोलले तेव्हा सांगीतले की वाचकांचा प्रतिसाद चांगला आहे..पुस्तक परिचय, कविता आणि सहका-यांचे लेखन जास्त वाचले जातेय..पण problem हा आहे की सहका-यांचे लेखन या सेक्शन मध्ये फारसं काही पोस्ट केलेलं नाही..मी mail ने forms पाठवले आहेत पण ते forms काही भरून परत आलेले नाहीत.

प्रसाद ने सांगितलं मिनल चे लेखन ही जास्त वाचलं गेलय..मिनलची आणि माझी ओळख आता या कल्याण ऑफिस ला येउन झालेली...प्रथमदर्शनी तिचं बोलण काहीसं उपरोधिक वाटतं पण एकदा चांगली ओळख झाली की तिच्या मनात दडलेलं खोडकर, मिश्किल मूल दिसू लागतं...मला आतून जाणवलेली ती संवेदनशील, कवी मनाची, शांत..आमची छान मैत्री आहे. मला शांत स्वभावाची माणसं जाम आवडतात कारण माझी बडबड ऐकून घ्यायला छान श्रोते मिळतात.

मी फेब्रुवारी मध्ये महिनाभर रजेवर आहे हे कळल्यावर ऑफिसच्या शेवटच्या दिवशी संध्याकाळी भेटायला आली म्हणाली 'ख़ास तुला भेटायला आलेय..आता तुझं हसू, जोक्स, कविता काही ऐकता येणार नाही...तुझी आठवण येईल यार...मी तुला रोज एक कवितेची ओळ SMS करत जाईन...

तेव्हापासून रोज न चुकता ती एखादी कवितेची ओळ, किंवा हिंदी चित्रपटातल्या गाण्याची ओळ (ज्यात हसू हा शब्द असेल अशी) पाठवतेय आणि असा हा आमचा सुरेल शब्दांचा प्रवास सध्या सुरु आहे..

आजची ओळ - मैंने कहा फुलोंसे...हसो तो वो खिलखिलाकर हंस दिए..

Monday, February 9, 2009

काव्या...



७.२.२००९

आज कंपनीच्या 'मराठी वाड.मय मंडळातर्फे ' 'आम्ही सारे लेकुरवाळे' हे नाटक शिवाजी मंदिरला होते.. खरं म्हणजे शहाड ते दादर हा प्रवास कंटाळवाणाच पण आज तोच छान वाटत होता...कारण आज जवळजवळ चार महिन्यानी मी लोकलचा प्रवास करीत होते..शहाडलाच गाडीमध्ये माझी आवडती 'राइट साइड विण्डो' मिळाली...खरं तर नाटक सकाळी दहाचं आणि मला तसा उशीरच झालेला..तिथे पोहोचेपर्यंत जवळजवळ पावणे अकरा होत आले होते.

प्रसादने मी आधीच सांगितल्यामुळे तिकीट बाजूला काढून ठेवले होते..छान पुढची पाचव्या रांगेतली जागा होती..नाटक सुरु व्हायच्या आधी दहावीच्या परीक्षेत चांगले गुण मिळवणा-या मुलांचा सत्कार झाला, नंतर आमचेच एक सहकारी आहेत त्यांचे पुस्तक प्रकाशित झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार झाला.

खरा अनपेक्षित धक्का तर पुढेच होता..कारण निवेदन करणारे म्हणाले की आजच्या Hi -Tech जमान्यात आपल्या वाड.मय मंडळानेही पुढचे पाऊल टाकले आहे आणि आपल्या मंडळाची वेब-साईट तयार करण्यात आली आहे आणि साईट तयार करणारे श्री. प्रसाद साखरकर आणि साईट साठी काम करणा-या सौ. रत्ना हिले यांचा इथे सत्कार करण्यात येत आहे...हे ऐकून यावर आधी विश्वासच बसेना की आपलं नाव पुकारल जातंय आणि आपल्याला स्टेज वर बोलावलं जातंय..

एवढ्या लोकांसमोर आपलं कौतुक होणं, छानशी फुलं मिळण हे खरच सुखद असतं..माझ्या मनावर अजुनही जणू आनंदाची तृप्ती पसरून आहे...या साईट साठी प्रसादने आणि मी एक सुंदर स्वप्न पाहिलं होतं की या साईटला आपण इतकं सुंदर बनवू की आपलं सगळे कौतुक करतील..हे स्वप्न इतक्या लवकर पूर्ण व्ह्यायला लागेल असं वाटलं नव्हतं…

मी घरी घेउन आले ती फ़क्त फुलं नव्हती तर आमच्या मेहनतीसाठी मिळालेली दाद होती..त्या फुलांवरून हात फिरवताना मनात म्हटलं उद्या ही फुलं कोमेजतील पण यांचे रंग यांचा गंध मनाला सतत उभारी देत राहील..

नाटक अकरा वाजता सुरु झाले..'संतोष पवारांची' नाटके संदेश देणारी, लोककलेच्या बाजाची..मला नाटक आवडले..नाटक संपल्यावर आधीच ठरवल्याप्रमाणे आयडियल मध्ये गेले आधी शब्दकोश घेतला आणि मग त्या दुकानाच्याच मागच्या बाजुला असलेल्या त्यांच्या दुस-या दालनात गेले...मला बा. भ. बोरकरांचा कुठलाही कवितासंग्रह हवा होता पण खूप शोधाशोध करूनही तो काही मिळाला नाही..मी मग इतर कवींचे चार कवितासंग्रह घेतले.

शांता शेळ्के : अनोळख
अनिल : दशपदी
ना. धो. महानोर : पक्ष्यांचे लक्ष थवे
विविध कवी : कवितांच्या गावा जावे

चारही कवितासंग्रह छान आहेत..अधुनमधून चाळ्तेय...श्रीपाद सरांनाही कवितासंग्रहांबद्दल लिहिले होते..ते म्हणाले छान तर सध्या कविता वाचताय..तुम्हाला 'काव्या' म्हणायला हवे...

खरच किती छान आहे हे नाव 'काव्या'....

काव्या...

तुझमें रब दिखता हैं...

आताच मागे येउन गेलेला 'रबने बना दी जोड़ी' हा चित्रपट मी अजून काही पाहिलेला नाही पण त्यात 'श्रेया घोषाल' ने खूप गोड गायलेलं 'शीर्षक गीत' माझं खूप आवडतं आहे..

"ना कुछ पूछा..ना कुछ माँगा...
तुने दिलसे दिया..जो दिया
ना कुछ बोला..ना कुछ तोला
मुस्कुराके दिया..जो दिया

तू
ही धुप...तू ही छाया...
तू ही अपना...पराया
और कुछ ना जानू...बस इतनाही जानू...

तुझमें रब दिखता हैं..यारां मैं क्या करूँ...
सजदे सर झुकता हैं...यारा मैं क्या करूँ...

तुझमें रब दिखता हैं...यारां मैं क्या करूँ...
रबने बनादी....जोड़ी....

(माझ्या ओर्कुट प्रोफाइल वर या गाण्याचा विडियो आहे)

Sunday, February 8, 2009

सापुतारा

४.२.२००९

गेले दोन दिवस दिवसभर खूप वारा असतो.. सध्या रजेमुळे घरीच असल्याने बहुधा हे जास्त जाणवत असावे. दिवसभर पंखा नही लावला तरी चालतं..एखाद्या हिल-स्टेशन ला जसं वातावरण असतं तसं वाटतं..मला तर सापुतारा आठवला..

सापुता-याला इथून निघतानाच उशीर झाला होता..दुपारचे १२ वाजून गेले होते..तिथे पोहचेपर्यंत रात्र झाली..आधी राहण्याचे बुकिंग नसल्याने राहण्याचे ठिकाण शोधत बरेच हिंडलो होतो..आमचा ग्रुप ही मोठा होता..९-१० जण होतो..शेवटी एका बंगल्याचा वरचा भाग मिळाला..बाहर अक्षरशः कुडकुडत होतो..आत गेल्यावर जरा उबदार वाटले..

रात्री जेवायला असेच उघड्यावर असलेले 'गार्डन रेस्तोरांत' जेवलो..वाफाळलेलं सूप प्यायल्यावर बरं वाटलं..जेवण झाल्यावर Mr. त्यांचं आवडतं ताक प्यायचं होतं म्हणुन त्यांनी ते मागवलं...त्या माणसानं आणलेलं ते ताक इतकं थंड होतं की हे जवळजवळ ओरडलेच, "अरे, ये छास इतना ठंडा.."..तो ही निरागसपणे म्हणाला "हाँ साहब..अभी फ्रिजसे निकालकर लाया हूँ.." आम्ही खूप हसलो..यांनी जड़ अतःकरणाने ताकाचा ग्लास तसाच ठेवला आणि आम्ही निघालो.

सहज पुढे चालु लागलो तर एका हातगाडीवर लाकडं पेटवून चुलीवर अल्युमिनियम चे मोठे पातेले झाकण ठेउन ठेवलेलं..त्या पातेल्याच्या आत काय शिजतय याच्याशी आम्हाला काही घेणंदेणं नव्हतं..आम्ही आग दिसल्याबरोबर तिकडे भराभर गेलो आणि हात शेकु लागलो..अहाहा काय वर्णावी ती ऊब...

त्या विक्रेत्याला वाटले एवढे ग्राहकच आले आहेत की काय ..तो अगत्य दाखवत म्हणाला 'आओ आओ आणि पातेल्यात उकडत ठेवलेली सुंदर मक्याची कणसं दाखवली...नुकतेच जेवल्याने कणसं खायचा मोह आवरला आणि त्याला सांगितलं की बाबा रे आम्ही इथे शेकोटीच्या उबेसाठी आलो आहोत..

तो ही मग काही न बोलता आगीत लाकडं सारखी करत राहिला आणि गारठलेले आम्ही काही क्षण का होईना कुडकुडायचे थांबलो..

जादूभरे स्वर...

30.12.08

आज सकाळी ५.३० ला चालायला गेले..खूप थंडी होती..आमच्या सोसायटीच्या जवळच गणपती बाप्पाचं एक मंदिर आहे..पहाटेची प्रसन्न वेळ आणि मंदिरातून रेकॉर्ड वर वाजत होतं लताबाईंच्या स्वर्गीय स्वरातलं 'गजानना श्री गणराया..आधी वंदु तुज मोरया' हे भक्तिगीत...

त्यांचे स्वर मनात अलगद झिरपत जाणारे..पावलं क्षणभर थबकली..आपोआप डोळे मिटले गेले आणि मनोंमन नमस्कार केला..पुम्हा पावलांना गती देत पुढे चालत राहीले आणि हळूहळू ते जादूभरे स्वर जणू धुक्यात विरत गेले..त्यांची स्मृती माझ्या मनात ठेऊन..

आम्ही खूप मुक्त जगलो..

7.10.2008

आज ऑफिस मधून घरी येताना काही लहान मुलाना पतंग उडवताना पाहिले..छान वारा सुटला होता आणि त्यांचा पतंग उंच उंच चालला होता..मी पुढे निघाले..मला पटकन माझे बालपण आठवले..

लहानपणी मी बाहुलीशी खेळली असल्याचे मला आठवत नाही..आम्ही पतंग उडवायचो..भोवरा, chappi, गोट्या, आटयापाटया, गाड्यांचे जुने टायर काठीने हाकीत पुढे पळायचो..आणि पाउस सुरु झाला की रिकाम्या काचेच्या बाटल्यांमध्ये पाणी भरून डबक्याताले मासे पकडायचो..खरं म्हणजे ती शेपूट नं फुटलेली बेडकांची पिल्लं असायची..मग आम्ही ती मोजयचो आणि आईने हाक मारली की तिच्या रागाच्या भीतीने ती पुन्हा त्या डबक्यात ओतून द्यायचो..मला तर भोवरा अजुनही फिरवता येतो..फ़क्त तो हवेतच फिरवून वरच्यावर हातात कधी झेलता आला नाही..आता विचार केला तर वाटते आम्ही खूप मुक्त जगलो..

आता माझी लेक जर मला म्हणाली की मला डबक्याताले मासे धरु दे..तर तिला मी तसं करू देइन की नाही मला शंकाच आहे..खरं म्हणजे त्यांच्या अभ्यासापुढे त्याना बालपणच उरले नाही..शाळा म्हणजे factories झाल्या आहेत..साचे निर्माण करणा-या ..मायेचा ओलावा नाही की काही नाही..फ़क्त result महत्वाचा..
१.२.२००९

आज आमच्या समाजाचा (महादेव कोळी) महिलांसाठी हळदी-कुंकू समारंभ आणि मेळावा होता..अगदी पुणे, नाशिक, जव्हार पासून सगळे आले होते..या कार्यक्रमाची मी अध्यक्ष होते..मला काही भाषण वगैरे काही करता येत नाही पण प्रसंगानुरूप काही तरी बोलणे भाग होते...नेट वरून सावित्रीबाईंची थोडी माहिती मिळाली आणि साधारण पाच मिनिटांमध्ये संपेल असे भाषण लिहिले...


विद्येची देवता सरस्वती,
सर्व भारतीय स्त्रियांसाठी,
शिक्षणाची गंगा निर्माण करणा-या,
सावित्रीबाई फुले यांच्या पवित्र स्मृतीस
विनम्र अभिवादन..

इथे मंचावर उपस्थित मान्यवर आणि या मेळाव्याला आवर्जुन उपस्थित राहिलेल्या बंधु-भगिनींना माझा सप्रेम नमस्कार..

आज अशा प्रकारे मंचावरून आपल्याशी संवाद साधता येणे हा माझ्या आयुष्यातील फार मोठा क्षण आहे..

भगिनींनो आपण हळदी-कुंकू समारंभ, महिला मेळावा यामध्ये सावित्रीबाई फुलेंचा आवर्जुन उल्लेख करतो, त्यांच्या तसबीरीची पुजा करतो..कोण होत्या या सावित्रीबाई फुले ?

आजच्या शिक्षण घेऊन साक्षर झालेल्या पीढीला त्यांच्याविषयी नक्कीच माहिती असेल पण ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी सांगू इच्छिते की सावित्रीबाई यांचा जन्म स्वातंत्र्यपूर्व काळात १८३५ मध्ये झाला..त्या त्या काळच्या रुढीप्रमाणे वयाच्या आठव्या वर्षी त्यांचा विवाह महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी झाला..महात्मा फुल्यांनी शिक्षणाचे महत्व ओळखले होते. त्यांनी घरीच सावित्रीबाईना अक्षरांची ओळख करून देऊन त्यांना शिक्षण दिले.

१८४८ मध्ये पुण्यामध्ये मुलींची पाहिली शाळा सुरु झाली, म्हणजे आपल्याला स्वातंत्र्य मिळण्याच्याही १०० वर्षे आधी. त्या काळात मुलींनी, बायकांनी मुळात शिक्षण घ्यायचेच कशाला, त्यांना शिक्षणाची गरजच काय..त्यांनी फ़क्त चुल आणि मुल सांभाळावे असेच प्रश्न समाजाला पडत होते.

सुरुवातीला या शाळेत फ़क्त चार-पाच मुली येत, त्यांना शिकवण्यासाठी सावित्रीबाई जावू लागल्या की त्यांना गावक-यांकडून दगड मारले जात, त्यांच्यावर शेण-माती टाकली जाई..पण याही परिस्थीतीत महात्मा फुले यांच्या प्रेरणेने त्या अत्यंत शांतपणे आणि निग्रहाने आपले काम करीत राहिल्या..पुढे हळुहळु मुलींची संख्या वाढत गेली आणि स्त्री शिक्षणाचा दिवा अखंड तेवत राहिला..

भगिनींनो तुम्ही कधी विचार केलाय की सावित्रीबाईनी एवढा विरोध सहन करूनही मुलींना शिकवावसं का वाटलं असेल? तर मुलींच्या उत्कर्षासाठी त्यांच्या उज्वल भविष्यासाठी..

आज आपल्या समाजात आताची तरुण पिढी ही साक्षर आहे..आज आपण शिक्षणाचे महत्व ओळखले आहे, पण मनात रुखरुख कायमची राहून गेली आहे ती ही की आपल्या मागच्या पिढीतल्या आपल्या आई, मावशी, काकू यांना शिक्षण घेता आले नाही किंवा परिस्थिती मुळे, लवकर लग्न होण्याच्या आपल्यातील जुन्या रुढीमुळे त्यांना शिक्षण अर्धवट सोडावे लागले..त्या आज बोलून दाखवत नसल्या तरी त्यांच्या मनात कुठेतरी हा सल असेलच क आपणही शिक्षण घ्यायला हवे होते..

या शिक्षणाची एक गंमत असते बरं का भगिनींनो, ते कुठल्याही वयात घेता येतं..फ़क्त मनात इच्छा असली की झालं. आज ज्यांना लिहिता वाचता येत नाही, ज्यांना सही करता येत नाही, त्याऐवजी त्यांना अंगठा द्यावा लागतो अशा भागिनिनी आज एक संकल्प करायचाय की मी आजपासून सावित्रीबाईना स्मरून लिहायला, वाचायला सुरुवात करीन.

शिकायला सुरुवात करताना आधी तुमचं मनच तुम्हाला नाही म्हणेल..मनात म्हणाल काय करायचय आता या वयात शिकून..घरचे दारचे आपल्याला हसतील की काय? असे अनेक प्रश्न तुम्हाला पडतील पण या सर्वांवर मात करून मला शिकायचय ते स्वतःसाठी असं तुम्हाला तुमच्या मनाला सांगावं लागेल. घरात तुमची मुलं असतील, पती असेल त्यांची मदत घ्या आणि ज्ञानाच्या प्रकाशाला तुमच्या मनात येऊ द्या. येथे उपस्थित असलेल्या समस्त मुलं-मुली, पुरुषानाही आवाहन करीत आहे की तुम्ही सगळ्यानी त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन द्या. आपल्या घराघरातुन प्रौढ़ शिक्षण होऊ द्या.

आजपासून बरोबर एक वर्षाने आपण पुन्हा अशा मेळाव्यात भेटणार आहोत. तेव्हा या वर्षभरात अक्षरओळख करून घेणा-या महिला ज्या वाचू शकतील, लिहू शकतील, आपली सही करू शकतील अशा महिलांचा याच मंचावर जाहीर सत्कार केला जावा अशी मी आपल्या मंडळाला विनंती करत आहे. आपली कुठली अड्चण असेल, मदत हवी असेल तर आपले मंडळ मदतीसाठी नेहमीच तत्पर आहे. आपण विनासंकोच संपर्क साधू शकता.

आपण सगळ्याजणी सावित्रीबाईंच्या लेकी आहोत, तेव्हा आपण सर्वांनी आज येथे संकल्प करुया की मी शिक्षण घेत राहीन आणि माझ्या भगिनीनाही या ज्ञानमार्गावर घेउन चालत राहीन.

जाता जाता शिक्षण घेऊ इच्छिणा-या सर्व जागृत मनांना मी खूप खूप शुभेच्छा देत आहे.

आपला खूप वेळ घेतला.आपण सर्वांनी हे शांतपणे ऐकून घेतले त्याबद्दल मी आपली आभारी आहे. आपले मनापासून ध्यन्यवाद.

छान प्रसन्न सकाळ...

ऑक्टोबर २००८

आजच सकाळी दहा वाजता गावाला जाऊन आले.. भाऊबीजेला आम्ही सगळे सासरी ठरवून भेटतो... Mr. च्या बहिणी गावाला असतात.. त्या निमित्ताने सगळयांशी भेट होते.. माझ्या लेकिलाही तिची चुलत भावंडे भेटतात..खूप छान वाटते.. या वेळी सगळी आली होती पण माझे छोटे दिर आले नव्हते कारण त्यांचा बच्चू खूप लहान आहे.. तीन महिन्यांचाच आहे..

मग आम्हीच सासरी भाउबीज करून श्रीरामपुर ला गेलो..ते माझ्या सासरहून ८० की.मी. वर आहे..त्या बाळाचीही पहिलीच भाऊबीज होती.. दुस-या दिवशी मग आम्ही शिर्डी ला गेलो..त्यांच्या घरापासून २० की.मी. वर शिर्डी आहे..पण दर्शनाला जवळ जवळ ५ तास लागले.. आणि तिथे सर्वात मोठा problem हा झाला होता की शिर्डी मधल्या जवळ जवळ सगळ्या petrol pump वर petrol संपले होते.. आम्ही खूप petrol pump फिरलो पण petrol मिळतच नव्हते.. आम्हाला सांगीतले संध्याकाळी ४/५ वाजता कदाचित पेट्रोल येईल..

Mr. म्हणाले इथे थांबण्यात अर्थ नाही..गाडीत थोडेसे पेट्रोल आहे त्यावर संगमनेर पर्यत जाता येईल..तिथे कदाचित पेट्रोल मिळेल.. आम्ही नाशिक रोड ला आलो तर तिथे एक पेट्रोलपंप दिसला.. बरीच गर्दी दिसली..तिथे पेट्रोल नुकतेच आले होते.. आम्हाला पेट्रोल मिळायला जवळजवळ २०/२५ मिनिटे लागली, but its ok पेट्रोल मिळाले..

बरीच संध्याकाळ झाल्याने आम्हला कल्याणला येणे शक्य नव्हते..मी सहसा Mr. ना रात्री गाड़ी चालवू देत नाही..आमची मारुती आहे आणि ती छोटी असल्यामुळे समोरून येणा-या गाड्यांच्या दिव्यानी डोळे दिपतात..रात्री dipper वापरायचे असुनही कोणी नियम पाळत नाही..मग रात्री आम्ही अकोल्याला छोट्या दिरांकडे राहिलो..आणि आज पहाटेच ५.१५ ला निघालो..Mr. ना बँकेत आज half day असतो.. त्याना जायचे होते.. इथे कल्याणला ९.३० ला पोहचलो..

सकाळी निघालो तेव्हा अंधार होता..रस्ते रिकामे होते.. तुरळक कोठे दुधाचे कॅन घेउन जाणारी माणसे दिसत.. हळुहळु उजाडायला लागले आणि पूर्वेला गुलाबी तांबुस प्रकाश दिसायला लागला आणि बघता बघता सूर्यदेव आम्हाला hello म्हणायला आले..

खूप छान दिसत होता तो केशरी गोळा.. उजेड आला तसा पाहिले की डोंगर, दरया सगळ्या आसमंतावर धुक्याची दाट चादर पसरली आहे.. मऊ मऊ कापसासारखे ते धुके दिसत होते.. दुरचा रस्ता सुद्धा दिसेना.. त्या धुक्यात आमची गाड़ी गेली आणि समोरची काचच धुरकट झाली.. मग यानी वायपर सुरु केले तेव्हा पुढचे दिसू लागले.. हवेत गारवा, ते धुक, तो फ्रेशनेस.. छान प्रसन्न सकाळ घेउन आम्ही परतलो.. नेहमीच्या routine job साठी..
ब-याच दिवसांपासून ब्लॉग अपडेट करताच आला नाही...आता थोड़े लक्ष घालायला हवे..