४.२.२००९
गेले दोन दिवस दिवसभर खूप वारा असतो.. सध्या रजेमुळे घरीच असल्याने बहुधा हे जास्त जाणवत असावे. दिवसभर पंखा नही लावला तरी चालतं..एखाद्या हिल-स्टेशन ला जसं वातावरण असतं तसं वाटतं..मला तर सापुतारा आठवला..
सापुता-याला इथून निघतानाच उशीर झाला होता..दुपारचे १२ वाजून गेले होते..तिथे पोहचेपर्यंत रात्र झाली..आधी राहण्याचे बुकिंग नसल्याने राहण्याचे ठिकाण शोधत बरेच हिंडलो होतो..आमचा ग्रुप ही मोठा होता..९-१० जण होतो..शेवटी एका बंगल्याचा वरचा भाग मिळाला..बाहर अक्षरशः कुडकुडत होतो..आत गेल्यावर जरा उबदार वाटले..
रात्री जेवायला असेच उघड्यावर असलेले 'गार्डन रेस्तोरांत' जेवलो..वाफाळलेलं सूप प्यायल्यावर बरं वाटलं..जेवण झाल्यावर Mr. त्यांचं आवडतं ताक प्यायचं होतं म्हणुन त्यांनी ते मागवलं...त्या माणसानं आणलेलं ते ताक इतकं थंड होतं की हे जवळजवळ ओरडलेच, "अरे, ये छास इतना ठंडा.."..तो ही निरागसपणे म्हणाला "हाँ साहब..अभी फ्रिजसे निकालकर लाया हूँ.." आम्ही खूप हसलो..यांनी जड़ अतःकरणाने ताकाचा ग्लास तसाच ठेवला आणि आम्ही निघालो.
सहज पुढे चालु लागलो तर एका हातगाडीवर लाकडं पेटवून चुलीवर अल्युमिनियम चे मोठे पातेले झाकण ठेउन ठेवलेलं..त्या पातेल्याच्या आत काय शिजतय याच्याशी आम्हाला काही घेणंदेणं नव्हतं..आम्ही आग दिसल्याबरोबर तिकडे भराभर गेलो आणि हात शेकु लागलो..अहाहा काय वर्णावी ती ऊब...
त्या विक्रेत्याला वाटले एवढे ग्राहकच आले आहेत की काय ..तो अगत्य दाखवत म्हणाला 'आओ आओ आणि पातेल्यात उकडत ठेवलेली सुंदर मक्याची कणसं दाखवली...नुकतेच जेवल्याने कणसं खायचा मोह आवरला आणि त्याला सांगितलं की बाबा रे आम्ही इथे शेकोटीच्या उबेसाठी आलो आहोत..
तो ही मग काही न बोलता आगीत लाकडं सारखी करत राहिला आणि गारठलेले आम्ही काही क्षण का होईना कुडकुडायचे थांबलो..
No comments:
Post a Comment