Saturday, January 3, 2015

एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी...


एखाद्या वठत आलेल्या झाडाला 'नवसंजीवनी' देणारा क्षण कुठला असू शकतो ? 

कदाचित त्याच्या खोडावर नुकत्याच फुटलेल्या एखाद्या नव्या तांबूस -पोपटी, कोवळ्या पालवीचा स्पर्श...उन, वारा आणि त्याची जगण्याची उमेद घेऊन वाहणा-या त्याच्या आतील जीवनरसामुळेच या पालवीतून तो पुन्हा जगू पाहत असेल..

आयुष्याचंही असंच आहे..आपण इतरांच्या सावलीत वाढतो..आपण मोठे होतो आणि इतरांवर सावली धरतो...मग वाटसरू, मग ते आपले आप्त का होईनात, सावलीची गरज संपली की आपापल्या मार्गाने निघून जातात आणि मग झाड उडून गेलेल्या पक्ष्यांची वाट पाहत आणि रिकामी घरटी जपत वाट पाहत राहते...पण हे भावनिक परावलंबीत्व आता सर्वांनी जाणीवपूर्वक थांबवायला हवे आहे...जोपर्यंत आपण आपला आनंद हा दुस-याचे आपल्या आयुष्यात असण्या-नसण्यावर किंवा त्यांच्या ब-या-वाईट वागण्यावर बेतलेला असतो तोवर तुम्ही स्वतःसाठी कधीही जगत नसता...

जोपर्यंत आपण आपल्या अस्तित्वाला आत्मसन्मानाची, स्वाभिमानाची जोड देत नाही तोपर्यंत आपल्या जगण्यावर बाह्य गोष्टींचा प्रभाव हा पडतच राहणार असतो..आपल्या आनंदाचे कारण जोपर्यंत एखादी विशिष्ट परिस्थिती किंवा एखादी व्यक्ती आहे तोपर्यंत आपण मुक्त जगू शकणार नाही किंवा जगात ज्या काही इतर सुंदर गोष्टी आहेत किंवा आपल्या आजूबाजूला आपल्यावर मनापासून प्रेम करणारी माणसे आहेत त्यांच्याकडे आपले कधी लक्षही जाणार नाही...

कधी कधी ही भावनिक स्थिती आणखीनच बिघडत जाते तेव्हा माणूस एकतर आत्मघात तरी करतो किंवा त्या एका निर्णायक क्षणापासून त्याला आत्मभान तरी येते..तो विचार करू लागतो की का जगतोय आपण असे हे कणाहीन आयुष्य..आपली अस्मिता अशी कोणाकडून तरी पायदळी तुडवली जातेय आणि तरी आपण अजूनही परिस्थितीत बदल होईल अशा खोट्या आशेवर जगतोय...

तर सांगायचा मुद्दा हा की तो आत्मसाक्षात्काराचा क्षण म्हणजेच आपल्या आतला जीवनरस पुन्हा वाहू लागल्याचा क्षण...एका जागीच थांबलेल्या आपल्या आयुष्याला गती देणारा क्षण...वठलेल्या झाडावर पुन्हा पालवी फुलण्याचा क्षण...एकदा का हा क्षण आपल्या ओंजळीत प्राजक्ताच्या फुलांचा सुगंध होऊन आला की मनातही शांततेचा प्राजक्त फुलू लागतो आणि त्याची फुले मग आपल्या आयुष्याला शुभ्र रंग गंध देऊन जीवन हळुवार उलगडू लागतात आणि आपण शब्दरुपाने व्यक्त होऊ लागतो...

माझ्या एका अत्यंत आवडत्या गाण्याप्रमाणे मी ही नव्याने म्हणेन...एकाच या जन्मी जणू...फिरुनी नवी जन्मेन मी..

आभार :  U Tube 

No comments: