आता सध्या शनिवार, रविवार खूप धावपळीचे असतात..घरात साचलेली आठवडाभराची कामे आणि संध्याकाळी चार वाजता संस्कृतमध्ये गीता ऐकून म्हणण्याचा, अर्थ शिकून घेण्याचा क्लास...या जानेवारी २०१५ च्या १० आणि ११ तारखेपासून हा क्लास सुरु झाला..
आम्हाला शाळेत संस्कृत हा विषय नव्हता..पण लहानपणापासूनच संस्कृतचे आकर्षण होते...कधी काळी मी देखील संस्कृत मध्ये श्लोक म्हणू शकेन किंवा त्यांचा अर्थ समजू लागेल असे वाटले नव्हते..पण म्हणतात ना कि कुठल्याही चांगल्या गोष्टीची कामना केली कि ती योग्य वेळी पूर्ण होतेच.
आमचा हा वर्ग शनिवार आणि रविवार दोन दोन तासांचा एक वर्षभर होणार आहे..या क्लास ची कल्याण मध्ये नुकतीच सुरवात झाली आहे..आमची ही दुसरी batch..
मैत्रिणीसोबत आधीच्या batch च्या बक्षीस समारंभाला गेले होते..तेथील विद्यार्थ्यांचा वयोगट होता वय वर्ष ८ ते ८०..बहुतेक सर्वांनी पाठांतराची आणि इतर बक्षीसे मिळवली होती...संसारात अडकलेल्या किती जणींनी एक नवा आत्मविश्वास मिळवला होता..स्वतःला नव्याने शोधले होते...बक्षीसे स्वीकारताना त्यांना होणारा आनंद त्यांच्या डोळ्यांतून, चेह-यावरून दिसत होता..
आमचा क्लास कल्याणच्या टिळक चौकातील लक्ष्मी-नारायण मंदिरात होतो..हे मंदिर कल्याण गायन समाजाच्या समोर आहे...मंदिरात असे काही शिकण्याची ही पहिलीच वेळ आहे..छान वाटते...क्लास ची काही फी नाही पण मिळणारे ज्ञान अमुल्य आहे..
असे वाटते की आम्हाला 'गीता' शिकवण्यासाठी लाभलेल्या 'फडके madam' खरोखरच एक ऋषी असाव्यात आणि 'संथा' पद्धतीने शिकणारे आम्ही सगळे त्यांचे गुरुकुलातील विद्यार्थी असावेत..श्लोक शिकताना होणारा एक नाद, एक लय वातावरण भारून टाकते..
'संथा' पद्धत म्हणजे समोरच्या गुरूने श्लोक म्हणणे आणि आपण ऐकून ते योग्य रीतीने, गतीने, लयीत, योग्य शब्दावर आघात, विरामचिन्हे, व्याकरणाचे नियम पाळून ते म्हणणे...madam श्लोकांचा खूप छान अर्थ समजावत आमच्याकडून ते पुन्हा पुन्हा आम्हाला म्हणणे जमेपर्यंत म्हणवून घेत असतात...
हे शिकवताना आम्हाला एक वेगळा दृष्टीकोन असा दिला की मुळात शंभर कौरव हे प्रतीकात्मक आहेत...या माणसाच्या शंभर वाईट वृत्ती आहेत आणि त्या वृतींची नावे ही कौरवांची आहेत..पाच पांडव ह्या देखील वृत्ती आहेत...चांगल्या वृत्ती...ह्या सर्वांनी मिळून बनते आपले आयुष्य...आणि या सर्वावर अंकुश ठेवणारा तो योगेश्वर म्हणजे आपली सद्सद्विवेकबुद्धी...आपण संभ्रमात असतो तेव्हा आपल्याला योग्य मार्ग दाखवणारा तो योगेश्वर...
व्यासमुनी जर म्हणाले असते की या लोकहो, मी तुम्हाला तत्वज्ञान सांगतो तर किती जणांनी ते ऐकले असते...पण त्यांनी पात्र निर्मिती केली आणि तत्वज्ञानात नाट्य आणले...आज गीतेची निर्मिती होऊन ५१५१ वर्षे झाली आहेत पण त्यातील नाविन्य आजही तसेच आहे...आपल्याच देशात नाही तर इतरही देशात तिचा अभ्यास केला जातो..तेव्हा एक अभ्यास म्हणून मी हा क्लास join केला...
हा क्लास पुण्याच्या गीता धर्म मंडळ या संस्थेने सुरु केला आहे..कल्याण मधील हा एकच क्लास आहे..पुण्यात आजमितीला ५१ ठिकाणी हे वर्ग चालतात...गेली ८८ वर्षे हे मंडळ ‘गीताधर्मा’च्या प्रचाराची आणि प्रसाराची निरलस जनसेवा करीत आहे...
त्यांचे ध्येय : श्रीमद् भगवतगीतेत सांगितलेल्या आणि लोकमान्य टिळकांनी, 'गीतारहस्या'त प्रतिपादन केलेल्या, कर्मयोगाच्या प्रसाराने, भारतवर्षाच्या राष्ट्रधर्माची सर्वांगीण उन्नती करणे,
आणि
धोरण - अनेकानेक साधनांनी, गीतेतील कर्मयोगाचा अर्थात राष्ट्रीय धर्माचा, प्रसार व प्रचार करून, लोकशिक्षणाच्या माध्यमातून, सर्वांगीण राष्ट्रोंन्नती साधणे, म्हणजेच राष्ट्राचा अभ्युदय आणि नि:श्रेयस साधणे.
मला खूप आनंद आहे की मी या उपक्रमाचा लाभ घेऊ शकले..
अधिक माहितीसाठी वेबसाईट चा पत्ता :
http://geetadharmamandalpune.org/index.htm

No comments:
Post a Comment