Thursday, January 8, 2015

काव्य-चर्चा




डॉक्टर मोहंमद शकील जाफरी
प्रा. श्री गीतेश शिंदे




परवा रविवार दिनांक ४.१.२०१५ ला सकाळीच आमच्या कंपनी मधील सहकारी श्री. किरण येले यांच्या मेसेज आला की आज दुपारी चार वाजता काही कवी काव्य-चर्चेसाठी अंबरनाथला येणार आहेत. मेसेज वाचल्यावरच खूप आनंद झाला आणि मी या चर्चेत सहभागी होऊ शकते का हे विचारल्यावर 'नक्की या' असे सांगितले..

दुपारी वेळेत पोहचायचे तर घरची कामे भराभर आवरणे गरजेचे होते..मैत्रिणीला फोन केला..तिलाही साहित्याची आवड..तीही येते म्हणाली...सगळे आवरून गाडीने मी, माझे पती आणि मैत्रीण असे तिघे वेळेत कल्याणहून अंबरनाथ ला पोहचलो.

तेथे सगळे हळूहळू जमले... कवितेच्या ओढीने कोणी दादर, ठाणे, वसई तर एक कवी थेट मंचर (पुणे) येथून आले होते...माझ्यासाठी एक किरण जी सोडले तर इतर सगळे अनोळखी होते...ते सगळे एकमेकांना ओळखत होते..What's App च्या group चे ते सगळे सभासद होते...सर्वांनी आपला परिचय करून दिला त्यामुळे वातावरण मोकळे होण्यास मदत झाली..

मग कविता या साहित्य प्रकारापासून समाज दुरावत चाललाय..तेव्हा तिलाच कसे लोकांपर्यंत पोहचवता येईल..जसे कार्यक्रमातून, दिनदर्शिकेतून किंवा इतर माध्यमातून या विषयी सर्वांनी आपापली मते मांडली..यासाठी काय उपक्रम राबवता येतील याविषयी देखील चर्चा झाली...

येथे आलेले प्रा. श्री गीतेश शिंदे हे विद्यालंकार college मध्ये भौतिकशास्त्र शिकवतात...ते 'कविता पानोपानी' हा कार्यक्रमही करतात..U Tube वर यांचे काही videos देखील आहेत..त्यांच्या 'निमित्तमात्र' या कवितासंग्रहाची नुकतीच दुसरी आवृत्ती प्रकाशित झालेली आहे..त्यात मुक्तछंद काव्यप्रकारासोबतच 'त्रिवेणी' म्हणजे तीन ओळीत कवितेचा आशय मांडण्याचा नवीन प्रयोग केला आहे..

तिथे आलेल्या योगिनी mam या स्त्री-मुक्ती चळवळीशी संबंधीत कार्य करतात आणि 'ललकारी' नावाचे नियतकालिक ही चालवतात..

यात विशेष लक्षात राहिलेले ते कवी म्हणजे डॉक्टर मोहंमद शकील जाफरी उर्फ शकील मंचरी..त्यांनी पीएच. डी (रोमन उर्दू)-२०१४ आणि डी. लिट(हिंदी) - २०१४ केले आहे...त्यांचे १९८८ पासून  सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक, सांस्कृतिक आणि मुक्त पत्रकारिता या क्षेत्रात सक्रिय सहभाग घेतला आहे..अंधश्रद्धा निर्मुलन, व्यसनमुक्ती, एड्स जनजागृती, पर्यावरण आणि राष्ट्रीय सलोखा इत्यादी विषयांवर व्याखाने आणि लेखनाद्वारे जनजागृती केली आहे...

त्यांना स्थानिक, तालुका, जिल्हा, राज्य, राष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील १५० पुरस्कार प्राप्त झालेले आहेत..जसे :
भारतीय समाज विकास अकादमी, मुंबई, Pride of Nation Award 2007, International Human Rights Justice Federation, Satara - A world Human Right Social Award 2013 & Non-Violence International Award 2014, इत्यादी..
त्यांचा  'हे प्रेषिता' हा मराठी काव्यसंग्रह...(आगामी प्रकाशने - पाषाण हृदय-(हिंदी - काव्यसंग्रह), शेवाळ - (मराठी काव्यसंग्रह), मट्टीमनिषी - (तेलगू काव्यसंग्रह), गोहरे अनवार - (उर्दू लेखसंग्रह), Turn back to your Lord - (प्रबंध अनुवाद - इंग्लिश) इ. साहित्य प्रकाशित होणार आहे..

इतरही लोकांचा त्यांच्या गुणवैशिष्ट्यासह परिचय झाला पण त्यांची नावे लक्षात राहिली नाहीत..पुढच्या भेटीत नक्की लक्षात राह्तील..सगळ्यांनी आपल्या स्वतःच्या किंवा आवडलेल्या कविता सादर केल्या..मी देखील माझ्या दोन कविता वाचल्या..

मधे थोडा वेळ अंबरनाथचे नगराध्यक्ष 'श्री. चौधरी साहेब' वेळात वेळ काढून आमच्याशी ओळख करून घेऊन थोडे साहित्य, कला याविषयी बोलून गेले..अंबरनाथ मध्ये होणारे सांकृतिक कार्यक्रम, शहराच्या चौका-चौकामधून उभारलेली कलात्मक शिल्पे त्यांच्या सौंदर्यदृष्टीची साक्ष पटवतात...आताही २६ जानेवारीला रसिकांसाठी प्रथितयश कवींच्या काव्यवाचनाचा कार्यक्रम तसेच साहित्यिक उद्यानाचे उद्घाटन असे छान कार्यक्रम होणार आहेत...अंबरनाथ मध्ये होणा-या या उपक्रमांमध्ये श्री. किरण जी यांची मोलाची साथ आहे...घरी गेल्यावर सुद्धा किरण जी यांनी गायलेली त्यांची गजल आठवत राहिली..

अशा प्रकारे त्या दिवशी सर्वांशी झालेली भेट ही फक्त सुरुवात आहे..यापुढे अशा उपक्रमात अजून अजून रसिक सहभागी होत राहतील अशी खात्री आहे...एकमेकांच्या सहवासात अशी एक छानशी संध्याकाळ अनुभवून एकमेकांचा निरोप घेतला आणि सगळे परतीच्या प्रवासाला निघालो..परत लवकरच होणा-या दुस-या भेटीचा आनंद घेण्यासाठी...
---------------------------------

किरण जी यांची सुंदर गजल...

अता मैफली तू जरा स्तब्ध व्हावे
अता धूप मी तू अग्निकुंड व्हावे

अता बांधतो मी पुजा अक्षरांची
अता शब्द माझे समिधा बनावे

रृतू वाहणारे किती मी सहावे
तुझे चंद्र आता कसे सावरावे

किती साठवू मी तुझ्या पानजाळ्या
कितीदा नव्याने तुला आळवावे

तुझी कागदी पावसाळी जहाजे
कधी शांत वाहे कधी हेलकावे

जरी बंद केले तुझे कवडसे मी
कसे आतले हे दिवे मालवावे

तुझे पञ जेव्हा इथे जाळतो मी
धुराड्यातुनी दोन पक्षी उडावे

लिहाया तुला संपले शब्द माझे
अता वाटते की मला तू लिहावे.

( किरण येले )



No comments: